रशिया आणि युक्रेन यांच्यात मागच्या ३ वर्षांपासून युद्ध सुरू आहे. मात्र हे युद्ध सध्या अनिर्णितावस्थेत आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना अद्दल घडवण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी मोठा डाव खेळला आहे. रशियाकडून युक्रेनमधून युरोपियन देशांना होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर झेलेन्स्की यांनी निर्बंध लादले आहेत. मात्र झेलेन्स्की यांच्या या निर्णयाचा फटका युरोपमधील ४० देशांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या देशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रशियाकडून युरोपमधील ४० देश गॅस खरेदी करतात. या गॅसच्या माध्यमातून वीज उत्पादन केलं जातं. उद्योग चालतात. एवढंच नाही तर स्वयंपाकासाठी आणि वाहने चालवण्यासाठी या गॅसचा वापर होतो. मात्र आता युक्रेनने केलेल्या घोषणेमुळे ऐन थंडीच्या दिवसांत या देशांच्या तोंडचं पाणी पळण्याची वेळ आली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी घोषणा केली की, युक्रेनने आपल्या देशातून युरोपियन देशांना पाठवण्यात येत असलेला गॅसचा पुरवठा थांबवला आहे. आम्ही रशियाला आणच्या रक्तामधून डॉलर कमवायला देणार नाही. युक्रेनच्या या निर्णयामुळे युरोपियन देशांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक देश तर एकमेकांच्या आमने सामने आले आहेत. एवढंच नाही तर स्लोव्हाकिया आणि पोलंडसारख्या देशांना युक्रेनला करण्यात येत असलेला वीजपुरवठा बंद करण्याची धमकी दिली आहे.
ऑस्ट्रियाने सांगितले की, आम्ही काही प्रमाणात तयारी केली आहे. मात्र हे संकट मोठं आहे. थंडीच्या मोसमात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२५ मध्ये गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी सांगिते की, युक्रेनच्या या निर्णयामुळे रशियाला फार मोठा फरक पडणार नाही. मात्र युरोपियन देशांवर मोठा परिणाम होऊ शकतो. रशियातील गॅस हा स्लोव्हाकियामधून जातो. त्यासाठी स्लोव्हाकियाकडून ठराविक शुल्कही आकारलं जातं. येथूनच ऑस्ट्रिया, हंगेरी आणि इटलीपर्यंत गॅस पोहोचतो. आता युक्रेनच्या या निर्णयामुळे स्लोव्हाकियासमोरील अडचणीही वाढल्या आहेत.
दरम्यान, स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी युक्रेनला वीजपुरवठा बंद करण्याची धमकी दिली आहे. आता स्लोव्हाकियासारख्या देशाला रशियाकडून गॅस मिळवायचा असेल तर इतर मार्गांचा अवलंब करावा लागेल. तसेच अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. मात्र युक्रेनच्या या निर्णयाचा रशियाला फार मोठा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. कारण रशिया काळ्या समुद्रातील तुर्कस्ट्रीम पाइपलाइनच्या माध्यमातून हंगेरी, तुर्कीए आणि सर्बियाला गॅस पाठवू शकतो.