आधुनिक जगाची बाबा वेंगा रिया तात्सुकीने ५ जुलैला जपानमध्ये भयंकर काहीतरी घडणार असल्याची भविष्यवाणी केली होती. जपानच्या भागात त्या काळात ७०० हून अधिक भुकंपाचे धक्के बसले होते. परंतू, तसे काहीच घडले नाही आणि जपानी लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतू, ३० जुलैला रशियाच्या समुद्रात गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आणि त्याच्या लाटा जपानच्या समुद्र किनाऱ्यावर उसळू लागल्याने पुन्हा एकदा जपानी लोकांमध्ये धडकी भरली आहे.
५ जुलैला मोठे काहीतरी घडणार या भीतीने जगभरातून जपान व त्या भागातील पर्यटनाकडे पाठ फिरविण्यात आली होती. विमाने, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग रद्द करण्यात आली होती. परंतू, काहीच घडले नव्हते. रिया तात्सुकी ही महिला तिला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ लावून त्याची रेखाचित्रे काढायची आणि ती पुस्तकातून छापत होती. बहुतांश अंदाज खरे ठरलेले होते. यामुळे जपानच नाही तर जगभरातील लोकांनी ५ जुलैच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवला होता. ५ जुलैला नाही परंतू, तसाच धोका ३० जुलैला निर्माण झाला आहे.
जपान हवामानशास्त्र संस्थेने देशाच्या उत्तरेकडील मुख्य बेट होक्काइडोच्या दक्षिण किनाऱ्यावरील टोकाची येथे १.३ फूट उंचीचा त्सुनामी लाटा धडकत असल्याची नोंद केली आहे. एवढेच नाही तर खबरदारी म्हणून फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातील कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पात कोणतीही घटना घडलेली नसल्याचे जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी म्हटले आहे.
भूकंपानंतर जपान हवामान संस्थेने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. सकाळी १० ते ११.३० दरम्यान जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर ३ मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अमेरिकेच्या हवाई राज्यातही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या उत्तरेकडील होक्काइडो बेटाच्या किनारी भागात त्सुनामीच्या लाटा धडकल्याचे वृत्त एपी वृत्तसंस्थेने दिले आहे.
भूकंप आणि त्सुनामीच्या धोक्यानंतर, रशियाच्या सखालिन प्रदेशातील सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे आणि सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे.