इराकीम मीडियानुसार, सांसदांची आवश्यक संख्या नसल्याने सभापती महमूद अल-मशहदानी सभागृहातून बाहेर पडल्यानंतर संसदीय अधिवेशनात गदारोळ झाला. सुन्नी खासदार राद अल-दहलाकी यांच्यावर यावेळी हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांना शारीरिक दुखापतही झाली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खासदार एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.
खासदारांमध्ये कशावरून भांडण झाले?अधिवेशनावर बहिष्कार टाकणाऱ्या तकाद्दुम आघाडीच्या खासदारांनी शिया गटांसह संघीय सेवा आणि राज्य परिषदेच्या उमेदवारांना मतदान केल्यामुळे वाद झाला. संघीय सेवा आणि राज्य परिषदेची पदे सुन्नी आणि शिया गटांमध्ये विभागली जाणार होती, परंतु तकाद्दुम आणि शिया गटांच्या खासदारांनी राजकीय सहमतीला बाजूला ठेवून दोन्ही पदांसाठी शिया उमेदवारांनाच मतदान केले.
सभापती महमूद अल-मशहदानी यांनी मोठ्याने निषेध करण्यास सुरुवात केली आणि मतदान सुन्नी समुदायाच्या हक्कांवर अन्याय असल्याचे म्हटले. यावर, शिया खासदार अला अल-हैदारी यांनी 'घृणास्पद सांप्रदायिक' शिवीगाळ केली, त्यानंतर त्यांनी सुन्नी खासदार राद अल-दहलाकी यांच्याशी भांडण सुरू केले. सुमारे ५० खासदारांनी अल-दहलाकीवर हल्ला करून त्यांना क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इराकी संसदेत यापूर्वीही असेच वाद झाले आहेत. मे २०२४ मध्ये संसदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंधित वादावरून अनेक खासदारांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. दरम्यान, इराक हा शिया बहुल मुस्लिम देश आहे, जे देशाच्या लोकसंख्येच्या ५५-६५% आहे. तर, सुन्नी मुस्लिमांचीही लक्षणीय लोकसंख्या आहे. ते एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३५-४०% आहेत.