गेल्या आठवड्यात रशियातील कामचटकाला ८.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. आता कामचटकाच्या दारावर आणखी एक संकट उभे ठाकलं आहे. रशियाच्या आपत्कालीन विभागाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, कामचटकामधील ज्वालामुखीचा तब्बल ६०० वर्षांत पहिल्यांदाच उद्रेक झाला आहे. रशियन सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फुटेजमध्ये, क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीतून राखेचा एक मोठा ढग बाहेर पडताना दिसला आहे. जो स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या ग्लोबल ज्वालामुखी कार्यक्रमानुसार शेवटचा १५५० मध्ये उद्रेक झाला होता. तर, काही लोक म्हणत आहेत की, त्याचा उद्रेक ६०० वर्षांपूर्वी झाला होता.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्वालामुखीचा उद्रेक बुधवारी कामचटकाजवळ झालेल्या भूकंपाशी जोडला जाऊ शकतो, ज्यामुळे फ्रेंच पॉलिनेशिया आणि चिलीसारख्या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, तर जपान, रशिया आणि अमेरिकेच्या काही भागात त्सुनामीच्या लाटा धडकल्या.
ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची भीती!भूकंपानंतर, क्ल्युचेव्हस्कॉय ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कामचटका प्रदेशात भीतीचे वातावरण आहे. रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने सांगितले की, कामचटका द्वीपकल्पात झालेल्या स्फोटानंतर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जो त्या भागातून उडणाऱ्या विमानांना धोक्याचे संकेत देतो. ज्यामुळे अनेक उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. या भागात लोकसंख्या नसली तरी, या ज्वालामुखीने धोकादायक रूप धारण केले, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
"राखेचा ढग पूर्वेकडे, प्रशांत महासागराकडे सरकत आहे. त्याच्या मार्गात कोणतीही लोकसंख्या नाही," असे रशियन मंत्रालयाने टेलिग्रामवर म्हटल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
गेल्या आठवड्यात झाला विनाशकारी भूकंपबुधवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात ८.८ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे प्रशांत महासागरात त्सुनामी आली आणि जपानपासून हवाई आणि चिलीपर्यंत भीती पसरली. या भूकंपामुळे रशियन बंदर शहरांमध्ये पाणी साचले, लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले. हा इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक होता. शास्त्रज्ञांनी संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांचा इशारा दिला आहे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.