कोलंबिया : साऊथ कॅरोलिनात डेमोक्रॅटिकच्या प्रायमरीत हिलरी क्लिंटन यांनी बर्नी सँडर्स यांच्यावर मात करीत विजय मिळविला. यानिमित्ताने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हिलरी यांनी उमेदवारीवर दावा पक्का केला आहे. साऊथ कॅरोलिनात प्रायमरीत हिलरी यांना ७३.५, तर सँडर्स यांना २३ टक्के मते मिळाली. न्यू हॅम्पशायरच्या प्रायमरीत सँडर्सने हिलरी यांना पराभूत केले होते, तर आयोवात हिलरी यांना निसटता विजय मिळाला होता. या प्रायमरींच्या तुलनेत हिलरी यांचा हा मोठा विजय आहे. याच आठवड्यात नेवाडात हिलरी यांनी विजय मिळविला होता.राजकीय विश्लेषकांच्या मते हिलरी यांच्या विजयाची ही घोडदौड अलबामा, टेक्सास आणि जॉर्जियासह अन्य राज्यांत सुरूच राहील. दरम्यान, रिपब्लिकनचे एक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना हिलरी म्हणाल्या की, अमेरिकेची महान बनण्याची प्रक्रिया कधी थांबलेलीच नाही; परंतु आम्हाला अमेरिकेला पूर्ण बनविण्याची आवश्यकता आहे. भिंती उभारण्यायऐवजी आम्हाला हे गतिरोधक हटविण्याची गरज आहे, तर यानंतर हिलरी यांच्यावर टीका करताना ट्रम्प यांनी पुन्हा ई-मेलाच मुद्दा समोर आणला. ते म्हणाले की, या प्रकरणात एफबीआय हिलरी यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करीत आहे. सुपर ट्यूजडे सुपर ट्यूजडे म्हणजेच मंगळवारी ११ राज्यांत होणाऱ्या निवडणुकीसाठी आता सर्वच इच्छुक उमेदवार जोमाने कामाला लागले आहेत. एकाच वेळी होणाऱ्या या निवडणुकीतून निर्णायक कल समोर येणार आहे. मंगल की महादंगल, असेही या निवडणुकीला संबोधले जात आहे.
साऊथ कॅरोलिनात हिलरी यांचा विजय
By admin | Updated: February 29, 2016 03:05 IST