अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील रिचमंड येथील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाजवळ गोळीबाराची घटना घडली. हायस्कूलमधील कार्यक्रमानंतर तिथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जण ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोळीबारानंतर दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्य़ाचे रिचमंडचे पोलिस प्रमुख रिक एडवर्ड्स यांनी सांगितले. ज्या थिएटरमध्ये पदवीदान कार्यक्रम सुरू होता, तेथील अधिकाऱ्यांना स्थानिक वेळे सायंकाळी साडेपाच वाजता गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले, असे ते म्हणाले.
रिचमंड पब्लिक स्कूलने आपल्या वेबसाईटवर या घटनेचा उल्लेख केला आहे. थिएटरच्या पलीकडे असलेल्या मोनरो पार्कमध्ये गोळीबार झाला. कॉलेज कॅम्पसला लागून असलेल्या हायस्कूलच्या पदवीदान समारंभानंतर ही घटना घडली. विद्यार्थी आणि इतर उपस्थित लोक थिएटरमधून बाहेर पडत असताना त्यांना सलग 20 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला होता.