ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 12 - सीरियामध्ये झालेला रासायनिक हल्ला आणि त्यानंतर अमोरिकेने सीरियाच्या एअरबेसवर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे अमेरिका आणि रशियामधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुटनीती एकमेकांना मात देण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी आज दिलेल्या एका मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षिय कारकीर्द सुरू झाल्यापासून रशिया आणि अमेरिकेमधील संबंध अधिकच बिघडल्याचे सांगितले.
सीरियामधील अंतर्गत यादवीच्या मुद्यावरून रशिया आणि अमेरिका आमने-सामने आलेले आहेत. दरम्यान आज अमेरिकेसोबतच्या संबंधांबाबत पुतीन म्हणाले, दोन्ही देशात विश्वासाचा वातावरण, विशेषता: सामरिक पातळीवरील संबंध गेल्या काही काळात सुधारण्याऐवजी अधिकच बिघडले आहेत, असे तुम्ही म्हणू शकता. सीरियात झालेला रासायनिक हल्ला आणि नंतर अमेरिकेने केलेला क्षेपणास्त्र हल्ला यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राज्य सचिव आणि त्यांचे रशियन समकक्ष सर्जी लावरोव्ह यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी पुतीन यांनी हे विधान केल्याने या विधानाला महत्त्व आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापापासून आक्रमक परराष्ट्र धोरण स्वीकारले आहे. ट्रम्प यांनी आपल्या विरोधकांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवरून वाद निर्माण झाले आहेत. विशेषत: एकमेकांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अमेरिका आणि रशियामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.