वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसा ज्यो बायडन यांना २६४ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.यावेळी विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.तसेच मेल इन बॅलेट्समधील एकतर्फी कौल हा धक्कादायक असल्याचेही ते म्हणाले. मेल इन बॅलेट्स एकतर्फी डेमोक्रॅटच्या बाजूने दिसत आहेत. हा एक भ्रष्ट प्रकार आहे आणि लोकांनाही भ्रष्ट बनवत आहे.ज्यो बायडन फॉर्मात, डोनाल्ड ट्रम्प कोर्टातडेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी गुरुवारी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेत २७० हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली. व्हाइट हाऊसपर्यंत पोहचण्यासाठी बायडन यांना आता अवघ्या सहा प्रातिनिधिक मतांची (इलेक्टोरल व्होट्स) आवश्यकता आहे.बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बायडन यांना २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट्स मिळाल्याचे स्पष्ट झाले. ३ नोव्हेंबरला अखेरचे मतदान झाल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू आहे. बुधवारी बायडन आणि ट्रम्प यांना मिळालेल्या प्रातिनिधिक मतांमध्ये अनुक्रमे २३८ आणि २१३ असा फरक होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा, अरिझोना, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या सात राज्यांमधून काय निकाल येतो, याकडे लागले होते. गुरुवारी यापैकी मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी बायडन यांना पसंती दिल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, या राज्यांपैकी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांमध्येही बायडन पिछाडी भरून काढत असल्याचे चित्र आहे.
US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप
By बाळकृष्ण परब | Updated: November 6, 2020 07:54 IST
US Elections Result News: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत.
US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप
ठळक मुद्देअनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे मेल इन बॅलेट्समधील एकतर्फी कौल हा धक्कादायक डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आरोप