वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे.भारत आणि अमेरिका यांच्या संरक्षणविषयक संबंधाचे मॅटिस हे मोठे समर्थक मानले जातात. सिरिया आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैनिकांना परत बोलाविण्याच्या घोषणेदरम्यानच मॅटिस यांच्या राजीनाम्याचे वृत्त आले आहे. मॅटिस यांनी ट्रम्प यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, पद सोडण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण, अमेरिकेच्या अध्यक्षांना असा संरक्षणमंत्री हवा की, ज्याचे विचार आपल्याशी चांगल्या प्रकारे जुळतील. माझ्या कार्यकाळातील अंतिम दिवस २८ फेब्रुवारी २०१९ आहे. उत्तराधिकारी नियुक्त करण्यासाठी हा पुरेसा वेळ आहे. जिम मॅटिस यांनी हे स्पष्ट केले नाही की, सैनिकांना परत बोलाविल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. अर्थात, ट्रम्प यांच्या या निर्णयाने विविध विदेशी सहकारी आणि संसद सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. (वृत्तसंस्था)
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 05:17 IST