हाँगकाँग : लोकशाहीवादी आंदोलनाच्या दोन विद्यार्थी नेत्यांना हाँगकाँग पोलिसांनी बुधवारी अटक केली. जोशुआ वोंग आणि लेस्टर शुम अशी त्यांची नावे आहेत. गेल्या ऑगस्टपासून हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी विद्याथ्र्यानी आंदोलन सुरू केले आहे.
माँग कोक जिल्ह्यात शेकडो निदर्शक विद्याथ्र्याशी पोलिसांची मंगळवारी रात्री चकमक झाल्यामुळे त्यांना रस्त्यांवरून हटविण्याचा दंगल रोखणारे पोलीस प्रयत्न करीत आहेत. निदर्शकांच्या हाती पिवळ्या छत्र्या होत्या व ते ‘पूर्ण लोकशाही’ अशा घोषणा देत होते.
पिवळी छत्री ही निषेध चळवळीचे प्रतीक आहे. पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून मागे लोटले व जवळपास दोन तासांनंतर निदर्शकांचे तंबूही हटविले.
‘निदर्शकांचे हृदय तुम्ही पराभूत करू शकत नाही’ असे लिवू युक-लीन (52) यांनी पोलिसांच्या रांगेसमोर उभे राहून जोरात ओरडून सांगितले.
जून 1989 मध्ये बीजिंगमधील तियानानमेन चौकात लोकशाहीसाठी झालेल्या आंदोलनाला प्रशासनाने बळाचा वापर करून नष्ट केल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसमोर उभे ठाकलेले हाँगकाँगमधील हे लोकशाहीसाठीचे मोठे आंदोलन आहे. (वृत्तसंस्था)
माँग कोक जिल्हा हा निदर्शक विद्यार्थी आणि त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठीचा जमाव यांच्यातील संघर्षाचे मोठे ठिकाण ठरले आहे. (वृत्तसंस्था)