अंकारा : इस्लामी दहशतवाद्यांनी तीन महिन्यांपूर्वी इराकमध्ये ताब्यात घेतलेल्या तुर्कीच्या 49 जणांची शनिवारी सुखरूप सुटका केली. हे सगळे लोक तुर्कीमध्ये परतले आहेत, अशी माहिती तुर्कीचे पंतप्रधान अहेमेत डव्हुटोगलू यांनी दिली.
दहशतवाद्यांनी इराकच्या मोसूल शहरावर हल्ला केला तेव्हा तुर्कीच्या दूतावासातून 11 जून रोजी दहशतवाद्यांनी या 49 जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत दहशतवाद्यांनी इराक आणि सिरियाचा भाग ताब्यात घेतला होता. दोन अमेरिकन पत्रकार आणि ब्रिटिश मदत पथकातील कार्यकत्र्याचा इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी शिरच्छेद केल्याच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर या 49 जणांची सुखरूप सुटका झाली आहे हे विशेष.
या सुटकेसाठी तुर्कीने नेमके काय केले हे लगेच समजले नाही. या 49 जणांमध्ये तुर्कीच्या दूतावासातील 46, तर 3 जण स्थानिक इराकी नागरिक होते.
या सुटकेसाठी तुर्कीने कोणतीही खंडणी दिलेली नाही, ना दहशतवाद्यांच्या अटी मान्य केल्या, असे तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था ‘अनादोलू’ने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)