वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यातच आता ट्रम्प यांच्या भाचीचं पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यात ट्रम्प यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उल्लेख आहे. यातील काही दावे तर अतिशय धक्कादायक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्प यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. 'ट्रम्प यांनी महाविद्यालयाची फसवणूक करून प्रवेश मिळवला. त्यांनी पैसे देऊन एकाला त्यांच्या जागी परीक्षेला बसण्यास सांगितलं. ट्रम्प त्यावेळी हायस्कूलमध्ये शिकत होते आणि त्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चांगल्या गुणांची आवश्यकता होती,' असा दावा मेरी ट्रम्प यांनी केला आहे.मेरी ट्रम्प लिखित 'टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन' (Too Much and Never Enough: How My Family Created the World's Most Dangerous Man) पुस्तक २८ जुलैला प्रकाशित होणार होतं. मात्र आता ते १४ जुलैलाच प्रकाशित केलं जाणार आहे. मेरी ट्रम्प यांनी लिहिलेल्या पुस्तकाला मोठी मागणी असून लोकांना त्यामध्ये खूप रस आहे. त्यामुळे ते पुस्तक आधीच बेस्ट सेलरच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचलं असल्याची माहिती प्रकाशकांनी दिली आहे.विद्यापीठातील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत चांगले गुण मिळतील, असा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांना नव्हता. त्यामुळे त्यांनी एकाला पैसे देऊन स्वत:च्या जागी परिक्षेला बसवलं, असा दावा मेरी ट्रम्प यांनी पुस्तकात केला आहे. ट्रम्प यांच्याकडे पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या प्रख्यात वोर्टन बिझनेस स्कूलची पदवी आहे. मेरी यांनी केलेले दावे व्हाईट हाऊसनं फेटाळून लावले आहेत.
"मित्राला पैसे देऊन, त्याला डमी म्हणून बसवून पास झाले डोनाल्ड ट्रम्प"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 15:38 IST