आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला आता आणखी एक मोठा झटका बसला आहे. भाज्यांच्या राजा मानल्या जाणाऱ्या टोमॅटोनेपाकिस्तानमध्ये अक्षरशः महागाईचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कधीकाळी १०० रुपये किलो मिळणारा टोमॅटो आता चक्क ₹७०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
या किमती वाढण्यामागे देशांतर्गत पूर आणि व्यापार मार्गातील अडथळे तर आहेतच, पण विशेषतः अफगाणिस्तानने व्यापार थांबवल्यामुळे पाकिस्तानला हा मोठा धडा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
टोमॅटो झाले 'सोने'! सर्वसामान्य नागरिक हवालदिल
लाहोर, कराचीसह देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी १०० रुपये प्रति किलो दराने मिळणारे टोमॅटो आज विक्रमी ₹७०० प्रति किलो दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडून गेले असून, "गरिबांच्या भाजीला आता श्रीमंतांची किंमत" आल्याची चर्चा पाकच्या गल्लीबोळात ऐकायला मिळत आहे.
आकडे सांगतात भीषण वास्तव
समा टीव्हीच्या अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः पंजाब प्रांतातील शहरांमध्ये दरवाढ सर्वाधिक आहे.
झेलम: येथे टोमॅटोचे दर थेट ₹७०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
गुजरांवाला: या शहरात टोमॅटो ₹५७५ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
फैसलाबाद: येथील टोमॅटोचे दर १६० रुपयांवरून थेट ₹५०० रुपये प्रति किलो झाले आहेत.
लाहोर: येथे टोमॅटोचा दर ₹४०० प्रति किलोवर पोहोचला आहे, आधी हा दर केवळ ₹१७५ इतका होता.
मुल्तान: येथे ४५० रुपये प्रति किलोने टोमॅटो विकले जात आहेत, तर सरकारी दर ₹१७० आहे.
कारण काय?
टोमॅटोच्या या अभूतपूर्व दरवाढीमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे पाकिस्तानच्या मोठ्या भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक पुरवठ्यात मोठी कमतरता निर्माण झाली आहे.
दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अफगाणिस्तानसोबतचा व्यापार तणाव. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमा तणावामुळे अफगाण निर्यातीवर परिणाम झाला आहे. क्वेटा आणि पेशावर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधून होणारा टोमॅटोचा पुरवठा थांबल्यामुळे संपूर्ण पाकिस्तानमध्ये टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या किमती वाढल्या आहेत.
अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी झगडणाऱ्या पाकिस्तानला आता रोजच्या वापरातील भाजीसाठी एवढा मोठा फटका सहन करावा लागत असल्याने, टोमॅटोचा हा 'लाल राग' पाकिस्तानच्या सामान्य जनतेला चांगलाच महागात पडत आहे.
Web Summary : Pakistan faces soaring tomato prices, reaching ₹700/kg due to floods and halted Afghan trade. Lahore and Karachi residents struggle as budgets collapse.
Web Summary : पाकिस्तान में बाढ़ और अफगान व्यापार रुकने से टमाटर की कीमतें ₹700/kg तक बढ़ीं। लाहौर और कराची में बजट बिगड़ा।