पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. असीम मुनीर यांची बढती अशा वेळी झाली, जेव्हा पाकिस्तानी सैन्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. या संघर्षात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. मात्र, याच दरम्यान असीम मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील दुसरे फील्ड मार्शल बनले आहेत. यापूर्वी, अयुब खान यांनी १९५९ ते १९६७ पर्यंत हे पद भूषवले होते. पाक लष्कर प्रमुख जनरल मुनीर यांची फील्ड मार्शल पदावर बढती झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.
आता लोक असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्याच्या शाहबाज सरकारच्या निर्णयावर टीका करत आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले, आणि आता त्यांच्या लष्करप्रमुखांना देशाच्या सर्वोच्च लष्करी पुरस्काराने सन्मानित केले जात आहे, कदाचित हरल्यावर बक्षीस मिळण्याचं हे पाहिलंच उदाहरण असेल, असे लोक म्हणत आहेत .
गायक अदनान सामीनेही उडवली खिल्ली
पाकिस्तानी नागरिकत्व सोडून भारतीय नागरिक बनलेला गायक आणि संगीतकार अदनान सामी याने देखील मुनीर यांच्या प्रमोशनची खिल्ली उडवत एका जुन्या चित्रपटाची क्लिपिंग शेअर केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फील्ड मार्शल झाल्यानंतर जनरल #असीम मुनीर यांनी पाकिस्तान सरकारला उद्देशून केलेले स्वीकृती भाषण!' या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी असीम मुनीर यांच्या या प्रमोशनची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान शाहबाज यांनी घोषणा केलीपाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी एका निवेदनात केली. जवळजवळ ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या जनरलला या पदावर बढती देण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने त्यांच्या बढतीला मान्यता दिली आहे.