न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी, व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४% टॅरिफ (जशास तसा) कर लादला असून, तो बुधवारपासून म्हणजेच ९ एप्रिलपासून लागू होणार आहे. जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५०% कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे.
जो देश अमेरिकेला प्रत्युत्तर देईल त्याला सुरुवातीला ठरवलेल्यापेक्षा नवीन आणि खूप जास्त शुल्क आकारले जाईल, असा इशारा मी दिला आहे. याशिवाय, चीनसोबतच्या आमच्या नियोजित बैठका थांबवल्या जातील आणि अमेरिकेसोबत बैठकीची विनंती करणाऱ्या इतर देशांशी चर्चा त्वरित सुरू होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
चीन म्हणतो, आम्हीही व्यापार युद्धासाठी तयारअमेरिका आमच्यावर लादत असलेले शुल्क आणखी वाढवण्याची धमकी देऊन एकामागून एक चुका करत आहे. जर व्यापार युद्ध झाले तर चीन पूर्णपणे तयार आहे. अमेरिकेच्या शुल्काचा परिणाम होईल, पण आकाश कोसळणार नाही, असे चीनने म्हटले.
शेअर बाजार सावरला आशियाई आणि युरोपीय बाजारांमध्ये नोंदविलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय शेअरबाजारातही वाढ झाली. सेन्सेक्स १,०८९ अंकांनी वाढून ७४,२२७.०८ अंकांवर बंद झाला. ३० पैकी २९ कंपन्यांचे समभाग वधारले.