वॉश्गिंटन - भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. त्यातच न्यूयॉर्क टाईम्समध्ये मोठा खुलासा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कॅनडात आयोजित जी ७ शिखर संमेलनापूर्वी फोनवरून संवाद झाला होता. १७ जूनला मोदी आणि ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे झालेल्या संवादात ट्रम्प यांनी मोदी यांच्याकडे नोबेल पुरस्कारासाठी त्यांना नॉमिनेट करण्याचं सांगितले होते. डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्कारासाठी वारंवार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला संघर्ष संपवल्याचं विधान करतायेत असं न्यूयॉर्क टाईम्समध्ये खुलासा करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्टनुसार, १७ जूनला फोनवरून ट्रम्प मोदी यांना म्हणाले की, पाकिस्तान नोबेल शांतता पुरस्कारासाठी मला नॉमिनेट करणार आहे आणि भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्याचा मला अभिमान आहे. भारतानेही मला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नॉमिनेट करायला हवे. मात्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात त्यांना नकार दिला असं रिपोर्टमध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने बातमी देण्यात आली आहे.
'त्या' ३५ मिनिटांमध्ये संबंध बिघडले
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे भारतीय नेते संतापले आहेत. अलीकडच्या युद्धविराममध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची कुठलीही भूमिका नाही असं टेलिफोनवरून त्यांनी ट्रम्प यांना म्हटलं. युद्धविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट झाला होता. याच काळात मोदी-ट्रम्प यांच्यात संवाद झाला. परंतु मोदी यांनी स्पष्ट शब्दात भारत-पाकिस्तान युद्धविरामात ट्रम्प यांची भूमिका नसल्याचे सांगितले. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती नाराज झाले. तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमधील संबंध बिघडले. त्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड वॉर सुरू झाले. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले. न्यूयॉर्क टाईम्सने हा खुलासा वॉश्गिंटन आणि नवी दिल्लीतील १२ हून अधिकाऱ्यांशी बोलून केला आहे.
त्याशिवाय टेलिफोनवर ट्रम्प यांनी मोदींना यावर्षीच्या अखेरपर्यंत OUAD शिखर संमेलनाला भारत दौऱ्यावर येईन सांगितले होते. परंतु आता ट्रम्प यांचा या संमेलनाला येण्याचा कुठलाही प्लान नाही. डोनाल्ड ट्रम्प नोबेल पुरस्कारासाठी अभियान चालवत आहे. त्यात भारतीय नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्या मोहिमेला धक्का बसला. त्यातूनच भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडले. त्यात ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान यांच्यात युद्धविराम घडवले हे विधान मोदींना आवडलेले नाही. त्यावर भारतीय पंतप्रधान आणि अधिकारी नाराज आहेत त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले असंही न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
मुनीर-मोदी हस्तांदोलन करण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण दिले होते. हा त्यांच्या प्लॅनचा भाग होता कारण त्याच दिवशी ट्रम्प यांनी पाकिस्तानी आर्मी चीफ असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसला येण्याचे निमंत्रण दिले होते. मोदी यांनाही व्हाईट हाऊसला बोलावून तिथे मुनीर आणि मोदी यांच्यात हस्तांदोलनाचा कार्यक्रम ट्रम्प यांना करायचा होता. मात्र पंतप्रधान मोदींनी दिलेल्या नकारामुळे ट्रम्प यांचा प्लॅन फसला असंही न्यूयॉर्क टाईम्सने अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा केला आहे.