नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात पेटून उटलेल्या Gen-Z आंदोलकांनी तीव्र आंदोलन करत देशाच्या पंतप्रधानांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. मात्र त्यानंतरही नेपाळमधील तणावपूर्ण परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. सध्या नेपाळमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तसेच त्यासाठी काही नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र याचदरम्यान, Gen-Z मधील दोन गट आमने सामने येऊन भिडल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, Gen-Z आंदोलकांनी भारतीय प्रसारमाध्यमांना या भागातून जाण्याची सूचना दिली आहे. Gen-Zच्या एका गटाने पंतप्रदानपदासाठी सुशील कार्की यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसऱ्या गटाने कुलमन घिसिंग यांना हंगामी सरकारचं प्रमुख करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या नावाचा प्रस्तावरही एका गटाने दिला आहे. दरम्यान Gen-Z कडून झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात एक गट दुसऱ्याला मारहाण करताना दिसत आहे.
आंदोलन करत असलेल्या तरुणांपैकी एकाने सांगितले देश चालवण्यासाठी अनुभवी नेत्याची आवश्यकता आहे. देश चालवणं सोपं नाही. त्यात नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की ह्या चांगला पर्याय आहेत. किमान त्यांना देश चालवायला आणि सारं काही सांभाळायला जमेल.
दरम्यान, तरुण पुन्हा रस्त्यावर उतरल्याने काठमांडूमधील रस्त्यांवर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.