भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, आमच्यावर हल्ले करण्यासाठी रशियाला पैसे पुरवत असल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला होता. तसेच अमेरिकेने भारतावर लादलेले टेरिफ आणि दंड योग्य असल्याचे समर्थन त्यांनी केले होते. परंतू, हेच झेलेन्स्की भारताकडून डिझेल खरेदी करत असल्याचे बाहेर आले होते. आता एवढी वर्षे आपली गरज भारताकडून भागविणाऱ्या युक्रेनने १ ऑक्टोबरपासून डिझेल खरेदी थांबविणार असल्याचे जाहीर केले आहे.
आपले बिंग फुटताच युक्रेनने हा निर्णय घेत सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. दुटप्पी वागणाऱ्या युक्रेनने १ ऑक्टोबरपासून भारतात उत्पादन केलेले डिझेलची आयात करण्यावर प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनची एनर्जी कन्सल्टन्सी फर्म एनकोरने सोमवारी हे जाहीर केले आहे.
रशियाच्या हल्ल्यामुळे आणि उष्णतेमुळे युक्रेनमधील रिफायनरी बंद कराव्या लागल्या आहेत. यामुळे युक्रेन भारताकडून डिझेल खरेदी करत होता. युक्रेनचे व्यापारीच नाहीत तर युक्रेनचे संरक्षण मंत्रालय देखील भारताकडून युद्धासाठी डिझेल खरेदी करत आहे. भारतीय डिझेलची क्वालिटी चांगली आहे, यामुळे युक्रेन हे अमेरिकेला टाळून करत होते. युक्रेनने एकट्या ऑगस्ट महिन्यात ११९,००० टन भारतीय डिझेल आयात केले आहे. हा आकडा त्यांच्या एकूण आयातीच्या १८ टक्के आहे.
युक्रेनची युद्धक्षमता कमी करण्यासाठी रशिया ड्रोनद्वारे युक्रेनी रिफानरी आणि साठ्यावर हल्ला करत आहे. यामुळे सर्व रिफायनरी आणि ऑईल डेपो बंद झालेले आहेत. आता बिंग फुटल्यानंतर जगभरात युक्रेनची नाचक्की झाली आहे. यामुळे युक्रेनने भारताकडून येत असलेले डिझेल हे रशियाकडून आलेल्या कच्च्या तेलापासून बनलेले आहे की अन्य देशाकडून याची तपासणी करणार आहे. भारतीय डिझेलमध्ये रशियन घटक आहेत का हे शोधण्यासाठी प्रयोगशाळेत चाचणी केली जाणार आहे.