२८ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून थायलँड आणि कंबोडिया यांच्यात गोळीबार सुरू झाला. १० मिनिटांच्या या चकमकीत कंबोडियन सैन्याचे लेफ्टिनंट सुओन रौन यांचा मृत्यू झाला. या दोन्ही देशांनी एकमेकांवर पहिल्यांदा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर थायलँड आणि कंबोडिया यांच्यात सीमेवर अधिक सैन्य दल तैनात करण्यात आले. हा तणाव शांत करण्यासाठी थायलँडच्या पंतप्रधान पाइतोंग्तार्न शिनवात्रा यांनी १५ जूनला कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
या दोन्ही नेत्यांमध्ये १७ मिनिटे संवाद झाला. जो काही दिवसांनी लीक झाला आणि त्यामुळे थायलँडच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला. शिनवात्रा यांना अवघ्या १५ दिवसांत त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर २४ जुलैला पुन्हा थायलँड आणि कंबोडिया यांच्यात संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत या संघर्षात ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. २ लाखाहून अधिक लोकांनी या संघर्षातून पलायन केले आहे. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांत मध्यस्थी करत थायलँड आणि कंबोडिया दोन्हीही देश सीजफायर चर्चा करण्यासाठी तयार झालेत असं सांगितले.
शिवमंदिरावरून बौद्ध देशांमध्ये संघर्ष वाढला
थायलँड पंतप्रधान यांचे देशात काही चालत नाही, सैन्य त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही असं हुन सेन आणि कंबोडियन सरकार म्हणत आहे. त्यातच कंबोडियाने सीमावर्ती भागात गस्त वाढवली आहे. आपली प्रतिष्ठा आणि बॉर्डरवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते थायलँडच्या सैन्याला प्रत्युत्तर देत आहेत. त्यात २४ जून रोजी थायलँड आणि कंबोडिया सीमेवर बनलेल्या ९०० वर्ष जुन्या शिव मंदिराजवळ दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळला. हे दोन्ही देश या मंदिरावर स्वत:चा हक्क सांगतात. हे मंदिर थायलँड त्यांच्या नकाशात दाखवते परंतु कंबोडिया ते आपले असल्याचा दावा करते.
थायलँड सैनिकांनी गुरुवारी सकाळी ६.३० च्या सुमारास मंदिराच्या चहुबाजूने काटेरी तारा लावल्या. त्यानंतर ७ वाजता एक ड्रोन उडवले आणि ८.३० च्या सुमारास फायरिंग सुरू केली असा आरोप कंबोडियाचा आहे. कंबोडिया आणि थायलँड यांच्या युद्धात ३३ जणांचा जीव गेला आहे तर १०० हून अधिक जखमी आहेत. UN सुरक्षा परिषदेत या युद्धाबाबत तातडीने बैठक घेण्यात आली परंतु आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.