सीमावादनामपेन्ह (कंबोडिया) : डोंगरेक पर्वतरांगेच्या शिखरावर वसलेले प्रीह विहियर हे शिवमंदिर सध्या थायलंड आणि कंबोडियामधील वादाचे केंद्र ठरले आहे. या मंदिराचा इतिहास ११-१२व्या शतकातील सम्राट उदयादित्यवर्मन दुसरा यांच्या काळापर्यंत जातो. या प्रसात टा मुएन थॉम मंदिरात भगवान शंकर हे सर्वोच्च देवता म्हणून प्रतिष्ठापित आहेत.
१९०७ मध्ये कंबोडियातील फ्रेंच वसाहतवादी राजवटीने तयार केलेल्या एका नकाशामुळे सीमारेषेबाबत गोंधळ निर्माण झाला. नकाशातील अस्पष्टतेमुळे दोन्ही देशांमध्ये परस्परविरोधी दावे झाले. थायलंडने कंबोडियाकडील काही ऐतिहासिक मंदिरे व सीमाभागावरील ताब्यावर आक्षेप घेतला.
न्यायालयीन हस्तक्षेप, पण प्रश्न कायम
१९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय व अन्य संस्थांच्या हस्तक्षेपानंतरही हा वाद सुटला नाही. त्या काळी प्रीह विहियर मंदिर कंबोडियाचा भाग असल्याचे घोषित करण्यात आले.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थायलंडकडे, २ कंबोडियाकडे
या मंदिराचे ५ मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी दोन कंबोडियाच्या दिशेने असले तरी मुख्य प्रवेशद्वार थायलंडकडे असल्यामुळे थायलंड हा भाग आपला असल्याचा दावा करतो. प्रवेशद्वारावर नंदीची प्रतिमा आहे.
युनेस्कोची मान्यता आणि वाढलेला वाद
७ जुलै २००८ रोजी कंबोडियाच्या पुढाकाराने हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. हा दर्जा मिळाल्यानंतर मंदिराचे जतन व पर्यटनाला चालना मिळाली. त्याचवेळी थायलंड–कंबोडिया वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर सीमाभागात कंबोडियाई आणि थाई सैनिकांमध्ये लष्करी चकमकी सुरू झाल्या.
२०११ मध्ये संघर्ष पेटला
२०११ मध्ये हा संघर्ष उफाळून आला. सात दिवस चाललेल्या झटापटीत ३४ जणांचा मृत्यू झाला आणि हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. त्याचवर्षी संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना आपापली सैन्ये माघारी बोलावण्याचा आदेश दिला, पण वादग्रस्त भूभाग कोणाचा यावर निर्णय झाला नाही.
२०२५मध्ये पुन्हा उफाळला वाद आणि तणाव
२८ मे २०२५ रोजी एमराल्ड ट्रायंगल (थायलंड, कंबोडिया आणि लाओसची त्रिसंधी) परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला. आरोप असा की कंबोडियाच्या सैनिकांनी मंदिराच्या परिसरात प्रवेश करून राष्ट्रीय गीत गायले.