गेल्या काही महिन्यात विमानात बिघाड होऊन अपघात झाल्याच्या घटना समोर येत असतानाच आता जपानमधून देखील एक अशीच घटना समोर आली आहे. जपान एअरलाइन्सच्या शांघायहून टोकियोला जाणाऱ्या विमानात प्रवाशांनी भीतीदायक अनुभव घेतला. हे विमान अचानक २६,००० फूट खाली उतरल्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क वापरावे लागले.
काय घडलं नेमकं?
३० जून रोजी हे विमान चीनमधील शांघाय पुडोंग विमानतळावरून जपानच्या टोकियो नरिता विमानतळासाठी निघालं होतं. हे विमान जपान एअरलाइन्स आणि त्यांची लो-कॉस्ट कंपनी स्प्रिंग जपान यांच्या कोडशेअर अंतर्गत चालवलं जात होतं. विमानात एकूण १९१ प्रवासी होते.
एपीच्या वृत्तानुसार, उड्डाणानंतर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ते अवघ्या १० मिनिटांत ३६,००० फूटांवरून सुमारे १०,५०० फूटांपर्यंत खाली आलं. ही घटना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:५३ वाजता घडली.
प्रवाशांचा जीव मुठीत!
विमानात अचानक दाब कमी झाल्यामुळे ऑक्सिजन मास्क खाली आले. काही प्रवाशांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. एका प्रवाशाने सांगितलं, “एक आवाज आला आणि काही सेकंदातच ऑक्सिजन मास्क खाली आले. एअर होस्टेस रडत ओरडत होती की मास्क घाला, विमानात बिघाड झाला आहे.”
काही प्रवासी झोपलेले होते, तर काहींनी घाबरून थेट आपलं मृत्यूपत्र लिहायला घेतलं. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांना बँकेच्या पिनची आणि विम्याची माहिती तात्काळ पाठवली.
ओसाकामध्ये आपत्कालीन लँडिंग
प्रेसर सिस्टिममध्ये बिघाड झाल्याचा अलर्ट मिळताच, पायलटने आपत्कालीन स्थिती जाहीर केली आणि विमानाला जपानमधील ओसाका येथील कान्साय आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आलं. विमान रात्री ८:५० वाजता सुरक्षित उतरलं. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
प्रवाशांना नुकसानभरपाई
प्रत्येक प्रवाशाला १५,००० येन (अंदाजे ७,००० रुपये) प्रवास भरपाई म्हणून देण्यात आली आणि एक रात्रीचं निवासही पुरवण्यात आलं. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
बोईंग विमानांवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
गेल्या महिन्यात अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर बोईंग कंपनीवर चौकशी सुरू झाली आहे. त्यानंतरही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून, बहुतांश वेळा बोईंगचे विमान त्यात सहभागी होते.