जीव धोक्यात घालून अजगराला वाचविले
By admin | Published: June 21, 2017 01:43 AM2017-06-21T01:43:31+5:302017-06-21T01:43:31+5:30
अजगराचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यावर आडवे होणारे मॅथ्यू बॅगर सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहेत. मॅथ्यू यांना एक अजगर महामार्ग ओलांडत असल्याचे आढळून आले.
मेलबर्न : अजगराचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यावर आडवे होणारे मॅथ्यू बॅगर सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहेत. मॅथ्यू यांना एक अजगर महामार्ग ओलांडत असल्याचे आढळून आले. हा अजगर वाहनाखाली चिरडला जाण्याची शक्यता होती. अजगराला छेडणे किंवा वाहतूक रोखणे या दोन्ही गोष्टी कठीण होत्या. अजगराला वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव पणाला लावला. भरधाव वाहन आपल्याला पाहून थांबावे यासाठी मॅथ्यू चक्क रस्त्यावर आडवे झाले. आपल्याला रस्त्यावर आडवे पाहून लोक गाड्या थांबवतील, याची त्यांना खात्री होती आणि झालेही तसेच. लोकांनी आपापली वाहने थांबवली. अजगर सुरक्षितपणे महामार्गावरून निघून गेल्यानंतर मॅथ्यू उठून उभे राहिले. यावेळी काही लोकांनी मॅथ्यू बॅगर यांची छायाचित्रेही घेतली. त्यात ट्रॅसी हॅमबर्जर या महिलेचाही समावेश होता. ट्रॅसीने मॅथ्यू आणि अजगराचा फोटो फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा अजगर पिलबरा रिक आॅलिव्ह प्रजातीचा होता. आॅस्ट्रेलियातच ही प्रजाती आढळून येते. आज अजगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना वाचविणे गरजेचे आहे. काही जण मॅथ्यू बॅगर यांच्या या छायाचित्राची प्रशंसा करीत आहेत तर काही लोक याला वेडेपणा म्हणत आहेत. त्यांच्या मते यात मॅथ्यूचे प्राणही जाऊ शकले असते.