शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

झगमगत्या हाँगकाँगमधले गुदमरवणारे कोंडवाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 10:57 IST

Hong Kong News: हाँगकाँग म्हटलं की डोळ्यांसमोर येतात छोट्याशा बेटावरल्या उंचच उंच गगनचुंबी झगमगत्या इमारती! मात्र या श्रीमंत हाँगकाँगच्या पोटात माणसांना गुदमरत जगण्यास भाग पाडणारे कोंडवाडेदेखील आहेत. 

हाँगकाँग म्हटलं की डोळ्यांसमोर येतात छोट्याशा बेटावरल्या उंचच उंच गगनचुंबी झगमगत्या इमारती! मात्र या श्रीमंत हाँगकाँगच्या पोटात माणसांना गुदमरत जगण्यास भाग पाडणारे कोंडवाडेदेखील आहेत. 

हे कोंडवाडे बघायचे असतील तर हाँगकाँगमधील क्वून टाँगमध्ये जायला हवं. हाँगकाँगमधील सर्वात दाट लोकवस्ती असलेला, अति गरीब लोकांचा विभाग म्हणून क्वून टाँगची ख्याती आहे.  कष्टकरी, कामकरी लोकं इथे गर्दी करून राहतात. ही माणसं किती दाटीवाटीनं राहतात हे समजून घेण्यासाठी लिऊ, सिऊ मिंग, ब्रेन शेक  या माणसांच्या घरात डोकावं लागेल. ही माणसं दोन लाख वीस हजार लोकांपैकी एक आहेत, जी ६० ते ७० चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये राहतात. स्वयंपाकपाणी, खाणंपिणं, झोपणं, सकाळची आन्हिकं हे सगळं या एवढुशा जागेतच!

उत्पन्नातल्या कमालीच्या विषमतेमुळे हाँगकाँगमधील लाखो लोकांना किमान सोयींपासून कोसो दूर असलेल्या जागेमध्ये स्वत:ला कोंडून घेत जगावं लागतं. पण आता ही जागाही आपल्यापासून हिरावली जाईल की काय, अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. याचं कारण म्हणजे हाँगकाँग प्रशासनाने छोट्या घरांबाबत नवीन मानकं निश्चित करून त्यांची अंमलबजावणी करण्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार हाँगकाँगमधील अशी ३० हजार घरं पाडावी लागतील किंवा त्यांचं नूतनीकरण करावं लागेल.  फ्लॅटधारक आर्थिक नफ्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी जागेत राहण्याची सोय म्हणून एकाच घराला अनेक खोल्यांमध्ये विभागतात.  या विभागलेल्या खोल्या लोकांना भाड्याने देतात. 

लिऊ या आपल्या बारा वर्षांच्या मुलीसोबत अशाच भाड्याच्या वीतभर खोलीत राहतात. या खोलीत स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्रच  आहे.  स्वयंपाकाची भांडीकुंडी त्यांना शौचालयाच्या वर टांगावी लागतात. खोलीत भाज्या धुवायला, भांडी धुवायला साधं सिंकही नाही. ८० चौरस फुटाच्या त्यांच्या खोलीत त्यांना झोपायला जागा आहे ती केवळ २० चौरस फुटांची. घरातलं खाजगीपण थोडं तरी जपलं जावं यासाठी त्यांनी खिडकीला कागद लावलाय. बाहेरचे उंदीर खोलीत येऊ नयेत म्हणून त्यांना खिडकीदेखील बंद ठेवावी लागते. जागेअभावी घरातलं बरंचसं सामान खोलीबाहेरच ठेवावं लागतं. 

स्वयंपाकघर आणि शौचालय एकत्र अशी रचना येथील बहुतांश घरात पाहायला मिळते. काही खोल्यांमध्ये तर केवळ स्वयंपाकघर किंवा केवळ शौचालय असतं. दोन ते तीन कुटुंबं मिळून त्याचा वापर करतात. अशा वीतभर खोलीचं भाडं आहे ५००  अमेरिकन डाॅलर्स.  बांधकाम साइटवर काम करणाऱ्या लिऊ यांच्या पगारातला पाव भाग भाडं भरण्यातच जातो. मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या लिऊ यांना यापेक्षा लहान असली तरी थोडी स्वस्त जागा मिळाली तरी चालणार आहे.

जगभरात हाँगकाँग शहरात घराच्या किमती, घराची भाडी सर्वात जास्त आहेत. म्हणूनच की काय  इवल्याशा जागांमध्ये राहणाऱ्या इथल्या गरीब माणसांनी आपल्या अपेक्षाही कमी ठेवल्या आहेत. आता लवकरच  या घरांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. छोटी घरं हा हाँगकाँगमधील लोकांच्या नाराजीचा विषय झाला आहे. २०१९ पासून हाँगकाँगमधील छोट्या घरांमुळे लोकांमध्ये सरकार विरुद्ध अस्वस्थता, नाराजी  निर्माण होत आहे. म्हणूनच बीजिंगने २०४९ पर्यंत हाँगकाँग प्रशासनाला विभाजित घरं हटवण्याचा आग्रह केला आहे. त्यानुसार हाँगकाँगचे नेते आणि शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी छोट्या घरांबाबत नियम आणि मानके तयार केली आहेत. त्यानुसार प्रत्येक घराला स्वतंत्र स्वयंपाकघर आणि न्हाणीघर असावं, प्रत्येक खोली किमान ८६ चौरस फुटाची असावी आणि प्रत्येक खोलीला खिडक्या असाव्यात, असा नियम करण्यात येणार आहे. या नियमात आता अस्तित्वात असलेली निम्मी घरं बसत नाहीत, असं तज्ज्ञ सांगतात. लाखो माणसांना महागड्या हाँगकाँगमध्ये ६०-६५  चौरस फुटांचीच घरं परवडत होती. आता या नवीन धोरण आणि मानकानुसार ही घरं जर पाडली गेली, तर डोक्यावर परवडणारं छप्पर कुठे मिळेल, हा प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरित आहे.

हा ‘पिंजरा’ गेला, तर राहणार कुठे?हाँगकाँग प्रशासनाच्या नवीन धोरणानुसार लोकांचे प्रश्न सुटणार नसून वाढणारच आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.  भाड्याने घर घेणंही लोकांना परवडणार नाही.  विभाजित घरं पाडून, या घरातील माणसांना बाहेर काढून त्यांची काय सोय करण्यात येणार आहे, त्यांना सार्वजनिक गृहसंकुलात जागा दिली जाणार का? याबाबत काहीच स्पष्ट धोरण नसून शवपेट्या आणि पिंजऱ्याप्रमाणे असणाऱ्या ६०-६५  चौरस फुटांच्या छोट्या, अति नित्कृष्ट  खोल्यांचा तर प्रशासनाने विचारही  केलेला नसल्याने लोक हवालदिल आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय