पाकिस्तानमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. आता पाकिस्तानमधून एक अजब घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. जॉगर्स, शूज आणि उबदार ट्राउझर्सवर अब्जावधी रुपयांचे आगाऊ पैसे देण्यात आल्याचे समोर आले आहे. पण या वस्तू पोहोचवल्या गेल्या नाहीत. इतकेच नाही तर किनारपट्टीच्या संरक्षणासाठी बोटी खरेदीमध्येही असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे. हे सर्व पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नागरी कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये घडले आहे. ऑडिट अहवालात या खुलाशानंतर गोंधळ उडाला आहे.
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व खरेदीमध्ये मूलभूत नियमांचेही पालन करण्यात आले नाही. "संपूर्ण प्रकरणात अनियमित खर्च, विशिष्ट पुरवठादारांना अनुकूलता आणि नियमांचे उल्लंघन यासारख्या गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. हे ऑडिट पाकिस्तानच्या विविध विभागांमध्ये केलेल्या खरेदीवर करण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तान रेंजर्स, फ्रंटियर कॉर्प्स, पाकिस्तान कोस्ट गार्ड इत्यादींचा समावेश आहे', असं द न्यूज इंटरनॅशनलच्या मते, अहवालात म्हटले आहे.
"पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निविदा प्रक्रिया देखील अपारदर्शी होती असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. डिलिव्हरीपूर्वी आगाऊ पैसे दिले होते, असंही यामध्ये म्हटले आहे.
चौकशीची मागणी
ऑडिट अहवालात चुकीच्या पद्धतीने खरेदी कशी करण्यात आली याची अनेक उदाहरणे दिली आहेत. "पंजाब रेंजर्सने लोकरीचे मोजे आणि अर्ध्या बाह्यांच्या बनियानांसाठी ४३ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचे कंत्राट दिले", असं एका उदाहरणात म्हटले आहे. ज्या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते त्या मानकांची पूर्तता करत नव्हत्या. परंतु असे असूनही, तांत्रिक समितीने त्यांना नाकारले नाही. लेखापरीक्षकांनी जबाबदारी निश्चित करण्यासाठी आणि या प्रकरणात चुकीच्या बाजूने काम करणाऱ्या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी चौकशीची मागणीही केली आहे.
या अहवालात पाकिस्तानी तटरक्षक दलाने केलेल्या अनियमिततेचाही उल्लेख आहे. त्यानुसार, पाकिस्तान तटरक्षक दलाने नौकांसाठी एका खाजगी कंपनीशी करार केला होता. या प्रकरणात ५६० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचे आगाऊ पैसे देण्यात आले होते. या नौका चार महिन्यांत वितरित करायच्या होत्या. २३ जुलै २०२४ ही अंतिम मुदत होती. पण जानेवारी २०२५ पर्यंत बोटी वितरित होऊ शकल्या नाहीत.
आधीच आर्थिक संकटामध्ये असलेल्या पाकिस्तानमध्ये आता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार समोर आला आहे. मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त आहे. आता यातच या घोटाळ्यांमुळे अडचणी वाढू शकतात.