श्रीलंकेतील उवा प्रांतातील बदुल्ला जिल्ह्यात गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. श्रीलंकेच्या पोलिसांनी शुक्रवारी घटनेची माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व प्रवासी दक्षिण श्रीलंकेतील टांगाले शहरातून पर्यटन सहलीसाठी निघाले होते. परंतु, बस एला शहराजवळ पोहोचली, तेव्हा एका तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या जीपला धडकली आणि रस्त्याची रेलिंग तोडून १००० फूट दरीत पडली. स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. अदादेरेना न्यूज पोर्टलनुसार, जखमींना बदुल्ला शिक्षण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम जखमींवर लक्ष ठेवून आहे.