कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नातेवाईक त्या व्यक्तीवर आपल्या धर्मातील रीतिरिवाजांप्रमाणे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करतात. मात्र जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका मुलाने मृत वडिलांवर अंत्यसंस्कार न करता जवळपास दोन वर्षे त्यांचा मृतदेह कपाटामध्ये तसाच ठेवला. आता पोलिसांनी या मुलाला अटक केली असून, त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून डोळ्यातून पाणी येईल असं, धक्कादायक कारण समोर आलं आहे.
याबाबत समोर आलेल्या अधिक माहितीनुसार ५६ वर्षीय नोबुहिको सुझुकी हे टोकियोमध्ये एक चायनिज रेस्टॉरंट चालवायचे. मागच्या काही दिवसांपासून त्यांचं दुकान बंद होतं. त्यामुळे लोक त्यांचा शोध घेत होते. अखेरीस ही बाब पोलिसांच्या कानावर गेली. जेव्हा पोलीस घरी पोहोचले तेव्हा त्यांना तिथे जे दृश्य दिसले ते पाहून धक्का बसला. घरामधील एका खोलीमधील कपाटात सुझुकी यांचा वडिलांचा मृतदेह ठेवलेला होता. त्यानंतर पोलिसांनी सुझुकी यांना अटक केली. तेव्हा केलेल्या चौकशीमधून सुझुकी यांच्या वडिलांचा मृत्यू २०२३ साली जानेवारी महिन्यात झाला होता, अशी माहिती समोर आली.
पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा सुझुकी यांनी सांगितले की, वडिलांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर आर्थिक चणचणीमुळे मला त्यांच्या अंत्यसंस्काराचा खर्च करण्यासारखी परिस्थिती नव्हती. त्यामुळे महागड्या अंत्यसंस्काराच्या विधीचा खर्च टाळण्यासाठी वडिलांचा मृतदेह कपाटामध्ये लपवला, अशी माहिती त्यांनी दिली.
खरंतर भारतीयांच्या दृष्टीने ही बाब थोडी विचित्र असली तरी जपानमध्ये अशा घटना नेहमी घडत असतात. जपानमध्ये अंत्यसंस्कार करणं खूप खर्चिक बाब आहे. त्यामुळे येथे गोरगरीब तसेच आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करणं बऱ्याचदा कठीण होऊन बसतं. आता समोर आलेली घटनाही आर्थिक अडचणीतूनच घडली आहे.