वॉशिंग्टन : अमेरिकेतील मिशिगन या प्रांतातील कालामाजू या शहरात एका बंदूकधाऱ्याने हॉटेलमधील पार्किंग, कार डीलरशिप आणि अपार्टमेंट परिसरात केलेल्या बेछूट गोळीबारात किमान ६ जण ठार झाले. मृतांत एका १४ वर्षीय मुलीचाही समावेश आहे.शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी व्यापक प्रमाणात शोध मोहीम राबवून एका ४५ वर्षीय संशयित नागरिकाला रविवारी ताब्यात घेतले. कालामाजू काऊंटीचे अंडरशेरीफ पॉल मॅटियास यांनी सांगितले की, ‘क्रॅकर बॅरल’ हॉटेलमधून गोळ्या लागून चार जणांचा मृत्यू झाला, तर डीलरशिपमध्ये पिता-पुत्र मृत्युमुखी पडले. अपार्टमेंट परिसरातही गोळीबार करण्यात आला. त्यात एक महिला गंभीर जखमी झाली. तिची प्रकृती चिंताजनक आहे.विशिष्ट लोकांना ‘लक्ष्य’ करून गोळीबार करण्यात आल्याच्या वृत्ताचा अधिकाऱ्यांनी इन्कार केला. कोणताही विचार न करता हा अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मॅटियास म्हणाले की, पोलिसांनी जेव्हा संशयिताला पकडले तेव्हा त्याने थोडाही प्रतिरोध केला नाही. त्याच्या मोटारीतून शस्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली; मात्र या घटनेनंतर रहिवाशातील घबराट संपुष्टात आल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकेत बंदूक जवळ बाळगल्यावर निर्बंध घालण्याची मागणी होत असतानाच ही गोळीबाराची आणखी एक घटना घडली आहे. स्वत: अध्यक्ष बराक ओबामा बंदुकीवर नियंत्रण टाकण्याच्या मताचे आहेत.
मिशिगनमधील गोळीबारात सहाजण ठार
By admin | Updated: February 22, 2016 03:37 IST