बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बांगलादेशच्या एका न्यायालयाने रविवारी शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना, ब्रिटिश खासदार ट्यूलिप रिझवाना सिद्दीक आणि इतर ५० जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. भ्रष्टाचार विरोधी आयोगाने दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या आरोपपत्रांवर विचार केल्यानंतर ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन यांनी हा आदेश दिला.
सत्तेचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे जमीन संपादित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक आदेशांच्या अंमलबजावणीच्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी न्यायाधीशांनी २७ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. बांगलादेशमधील वृत्तपत्रात आलेल्या वृत्तांनुसार, भूखंड वाटपातील भ्रष्टाचाराच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एसीसीने अलीकडेच ५३ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
१७ जणांविरोधात अटक वारंट
शेख हसीना यांच्यासह सर्व ५३ आरोपी फरार असल्याने, न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले, असे वृत्तपत्राने म्हटले आहे. १० एप्रिल रोजी, याच न्यायालयाने राजुक भूखंड वाटपाशी संबंधित एका वेगळ्या भ्रष्टाचार प्रकरणात हसीना, त्यांची मुलगी साईमा वाजेद आणि इतर १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
सायमा १ नोव्हेंबर २०२३ पासून नवी दिल्लीस्थित जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाई प्रादेशिक संचालक म्हणून काम पाहतील. पूर्वांचल न्यू टाउन प्रकल्पांतर्गत जमीन वाटपात अनियमिततेच्या आरोपांप्रकरणी माजी पंतप्रधानांवर एकूण सहा प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले आहेत.