Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 03:11 PM2022-02-28T15:11:59+5:302022-02-28T15:14:38+5:30

1986 मध्ये घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.

Russian troops have seized control of the Chernobyl nuclear power plant in Ukraine. | Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात

Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात

Next

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि  जीवितहानी झाली आहे. 

रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 

रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे. हा परिसर आता सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणं आता कठीण असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे. तीव्र संघर्षानंतर युक्रेननं याठिकाणचा ताबा गमावल्याचं ते म्हणाले.

बीबीसी मराठीच्या वृत्तानूसार, इतिहासातील सर्वांत गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता. अणूभट्टी फुटली आणि किरणोत्साराचे ढग आसमंतात पसरले.आठवडाभरात, कामगार आणि आप्तकालीन पथकातील कर्मचारी असे 30 जण किरणोत्साराची बाधा झाल्यानं दगावले. अख्खं प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. सुमारे 31 वर्षांपूर्वी झालेल्या अणुऊर्जा अपघातानंतर किरणोत्साराची भीती असल्यानं चेर्नोबिल शहर मनुष्यविरहित करण्यात आलं होतं. 

युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हपासून दोन तासाच्या अंतरावर चेर्नोबिलमधलं 30 किमीचं प्रतिबंधित क्षेत्र आहे. ही पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा मानली जाते. तिथं किरणोत्साराची बाधा होण्याचा धोका असल्यानं लोकांना मर्यादित काळासाठीच थांबता येतं. गेल्या काही काळात जगभरातील साहसी, उत्साही पर्यटकांनी चेर्नोबिलकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यातल्या काहींनी तर स्थानिक सरकारी हॉस्टेलमध्ये राहण्याचं धाडसही केलं होतं. पर्यटक या भागात एक किंवा दोन दिवसच असतात. या काळात होणाऱ्या किरणोत्साराचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. त्याच्यापेक्षा जास्त किरणोत्सार विमान प्रवासात असतो, असा दावा केला जात आहे.

बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष-

दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. रशियाचे सैन्य अधिकारी आज चर्चेसाठी बेलारूसच्या गोमेल शहरात दाखल झाले आहे. भारतीय वेळेनूसार दूपारी 3.30 वाजता रशिया आणि युक्रेनची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Russian troops have seized control of the Chernobyl nuclear power plant in Ukraine.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.