मागच्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच रशियासोबत शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने युक्रेनला राजी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत चर्चा करण्यासाठी पाठवलेल्या प्रतिनिधींना रशियाने ठेंगा दाखवल्याचं वृत्त आहे.
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अमेरिकेचे प्रतिनिधी मॉस्कोमध्ये पोहोचल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चा सुरू होणार आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिनिधींकडून रशियाला युक्रेनसोबत ३० दिवसांच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला जाणार आहे. मात्र शस्त्रसंधीबाबत रशियाने अद्याप कुठलीही हमी दिलेली नाही.
या घटनाक्रमादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. त्यात त्यांनी रशियासोबत चर्चेची शक्यता वर्तवली होती. मात्र मॉस्कोमधील रशियाच्या एका वरिष्ठ मुत्सद्द्याने रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधीच्या अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर टीका केली आहे. अशी शस्त्रसंधी ही केवळ युक्रेनच्या सैन्यासाठी दिलासादायक असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव शिगेला पोहोचलेला असताना रशियाची आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होत आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. अशा परिस्थितीत ही चर्चा आंततराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.