जकार्ता/सिंगापूर : तीन दिवसांच्या अथक शोधमोहिमेनंतर एअर आशियाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष आणि ३ मृतदेह मंगळवारी इंडोनेशियाच्या जावा बेटाजवळील समुद्रात आढळले. हे ठिकाण या दुर्दैवी विमानाचा संपर्क जेथे तुटला होता तेथून जवळ आहे. रविवारी सकाळी बेपत्ता झालेल्या या विमानात १६२ प्रवासी होते. दुर्घटनेचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एका युद्धनौकेने ३ मृतदेह पाण्याबाहेर काढले असून, आणखी मृतदेह हाती लागत असल्याने बचाव कर्मचारी कमालीचे व्यग्र आहेत, असे इंडोनेशियाच्या नौदलाने सांगितले. या विमानाचे अवशेष जावा बेटाच्या किनारपट्टीजवळील भागात आढळून आले. विमान समुद्रात कोसळल्याचे स्पष्ट होताच सुराबाया येथे प्रवाशांच्या नातेवाइकांच्या दु:खावेगाला पारावार राहिला नाही. हे अवशेष लाल आणि पांढऱ्या रंगाच्या विमानाचे असल्यास दुजोरा देण्यात येत आहे, असे ते म्हणाले. मंत्रालयाच्या शोध व बचाव पथकाला हे अवशेष सापडले. अश्रूंचा बांध फुटला... समुद्रात सापडलेले अवशेष बेपत्ता विमान ‘क्यूझेड ८५०१’ चेच असल्याचे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयातील हवाई परिवहन विभागाचे प्रभारी महासंचालक जोको मुर्जातमोदो यांनी सांगितल्यानंतर विमानातील प्रवाशांच्या नातेवाइकांच्या दुख:ला पारावर उरला नाही. त्यांच्या परतीची अखेरची आशाही संपुष्टात आल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. - आणखी वृत्त/१०
बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले
By admin | Updated: December 31, 2014 02:28 IST