ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या संघर्षावेळी युद्धविरामासाठी केलेली कथित मध्यस्थी, टॅरिफवरून झालेला वाद आणि आता एच-१बी व्हिसाबाबत जाहीर केलेलं प्रचंड शुल्क यामुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध हे कमालीचे बिघडले आहेत. त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते अलेक्झँडर डंकन यांनी टेक्सास येथे स्थापन करण्यात आलेल्या बजरंगबली हनुमानाच्या मूर्तीवरून आक्षेपार्ह विधान केलं आहे. अमेरिका हा ख्रिस्ती देश आहे. मग एका खोट्या हिंदू देवाची एवढी मोठी मूर्ती स्थापन करण्याची परवानगी आपण का देत आहोत, असा सवाल अलेक्झँडर डंकन यांनी उपस्थित केला आहे.
अमेरिकेतील टेक्सास येथे काही दिवसांपूर्वी बजरंगबली हनुमान यांची ९० फूट उंचीची महाकाय प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीवरून रिपब्लिकन नेते डंकन यांनी हे विधान केले आहे. त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर टेक्सासमध्ये स्थापित मारुतीची मूर्ती आणि टेक्सासमधील शुगरलँड शहरात असलेल्या अष्टलक्ष्मी मंदिरातील मूर्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच आम्ही टेक्सासमध्ये एका खोट्या हिंदू देवाची मूर्ती स्थापन करण्याची परवानगी का देत आहोत, असा सवाल या पोस्टमधून विचारला आहे.
त्याशिवाय एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये डंकन यांनी बायबलचा हवाला देत मोठा दावा केला आहे. त्यात ते म्हणतात की, तुम्ही माझ्याशिवाय इतर कुठलाही देव या पृथ्वीवर ठेवता कामा नये. तुम्ही स्वत:साठी कुठल्याही प्रकारची मूर्ती किंवा आकाश. पृथ्वी किंवा समुद्रामध्ये कुठल्याही वस्तूची प्रतिमा बनवता कामा नये.
दरम्यान, अलेक्झँडर डंकन यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत आता सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने रिपब्लिकन पार्टीच्या नेत्याचं हे वक्तव्य हिंदू विरोधी आणि प्रक्षोभक असल्याचं म्हटलं आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने याबाबत टेक्सासमधील रिपब्लिकन पार्टीकडे औपचारिकपणे तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.