Donald Trump Narendra Modi Friendship : भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल एक मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता की, अमेरिका भारताशी राजकीय संबंध सुधारण्यास तयार आहे का? कारण टॅरिफमुळे या दोन्ही देशांमधील संबंध गेल्या दोन दशकांतील सर्वात वाईट टप्प्यावर आहेत. यावर बोलताना ट्रम्प यांनी मोदी त्यांचे कायम मित्र राहतील असे म्हटले.
मी आणि मोदी कायमच मित्र राहू!
"डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये सांगितले की भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप खास आहेत. सध्या तणाव असूनही, मोदी आणि मी कायम मित्र राहू. ते एक उत्तम पंतप्रधान आहेत. ते महान आहेत. पण सध्या ते जे करत आहेत, ते मला आवडत नाही. असे असले तरीही भारत आणि अमेरिकेतील संबंध खूप खास आहेत. याबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. दोन देशांच्या राजकीय गोष्टींत असे क्षण कधीकधी येतच असतात," असे ते म्हणाले.
मी मोदींवर नाराज
ट्रम्प यांनी असेही म्हटले की, भारत रशियाकडून खूप तेल खरेदी करत आहे याबद्दल ते खूप निराश आहेत. आपण भारतावर खूप टॅरिफ लादला आहे, सुमारे पन्नास टक्क्यांचा आकडा आपण गाठला आहे. पण तो वेगळा विषय आहे. पंतप्रधान मोदींशी माझे संबंध चांगले आहेत. ते खूप चांगले आहेत. ते काही महिन्यांपूर्वी येथे आले होते. ते माझे कायमस्वरूपी मित्र आहेत."
भारत आणि इतर देशांसोबतच्या व्यापार चर्चा कशा चालल्या आहेत, असेही ट्रम्प यांना विचारण्यात आले. त्यावर ट्रम्प म्हणाले की सर्व देशांशी अमेरिकेचे राजकीय संबंध उत्तर आहेत. पण आम्हाला युरोपियन युनियनबद्दल काहीशी निराशा आहे.
भारत आणि रशियाला चीनमुळे गमावले...
ट्रम्प यांनी काल एक ट्विट करत म्हटले होते की, अमेरिकेला चीनमुळे भारत आणि रशियासारखे चांगले मित्र गमवावे लागले. यासोबतच ट्रम्प यांनी मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा फोटोही पोस्ट केला होता.