गेल्या दोन रात्रींपासून सुरू असलेल्या शत्रूच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारताने चोख उत्तर देऊन परतवून लावले आहे. ९ आणि १० मेच्या रात्री पाकिस्तानने आपल्या 'फतेह २'या क्षेपणास्त्राने दिल्लीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणेने पाकचे नापाक मनसुबे उधळून लावले. फतेह २ क्षेपणास्त्र हवेतच पाडून भारताने हा हल्ला परतवून लावला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी श्रीनगर हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने त्यालाही चोख प्रत्युत्तर दिले. या सगळ्यात पाकिस्तानचे भरपूर नुकसान झाले आहे.
भारताने पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तर, क्षेपणास्त्र हल्ला करत पाकचे चार हवाई तळ देखील बेचिराख केले आहे. आता पाकिस्तान सैन्य हे नुकसान लपविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. भारतीय हल्ल्यांमुळे झालेले नुकसान लपविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य रणनीती आखत आहे. पाकिस्तानचे माध्यम तिथे झालेल्या नुकसानीचे कोणतेही वृत्त प्रसारित करत नाहीत. पाकिस्तानी माध्यमांमध्ये भारतीय हल्ल्याशी संबंधित कोणतेही वृत्त प्रसारित केले जात नाही.
नुकसानाशी संबंधित दृश्ये दाखविण्यावर बंदी!
भारतीय हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाशी संबंधित दृश्ये दाखविण्यावर पाकिस्तानी लष्कराने पूर्ण बंदी घातली आहे. पाकिस्तानी सैन्याशी संबंधित अकाउंट्सनी वापरकर्त्यांना सोशल मीडियावर झालेल्या नुकसानाचे फोटो पोस्ट करू नयेत, असे आवाहन केले आहे आणि आधीच पोस्ट केलेले फोटो काढून टाकण्यास सांगितले आहे.
प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य तत्पर!
सलग दुसऱ्या रात्री, शुक्रवारी भारताने पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत २६ ठिकाणी पाकिस्तानने केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले भारतीय सैन्याने निष्क्रिय केले आहेत. संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, विमानतळ आणि हवाई दलाच्या तळांसह महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचे शत्रूचे प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडण्यात आले.