नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बालाकोटवर भारतीय हवाई दलाने हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदने आपले दहशतवादी प्रशिक्षण तळ अफगाणिस्तानमधील कुनार, नांगरहार, नुरिस्तान, कंदाहार प्रांतामध्ये हलविले आहेत. ही माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाल्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला चढविला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील तालिबानी, हक्कानी नेटवर्क यांच्याशी संगनमत करून आपले प्रशिक्षण तळ त्या देशात हलविले. लष्कर-ए-तोयबाचे नेते व त्यांच्याशी संलग्न असलेल्या पाच धर्मादाय संस्थांवर इम्रान खान सरकारने १ जुलै रोजी केलेली कारवाई हे नाटक असल्याचे मोदी सरकारचे मत आहे.
पाकिस्तान व अफगाणिस्तानला लागून असलेल्या ड्युरँड रेषेच्या भागात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हलविण्यात आले आहेत. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
जैश-ए-मोहम्मदचा नेता हाजी अब्दुल साफी याच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गट काबूलमधील भारतीय दूतावासावर हल्ले चढविण्याची भीती आहे. कारी वारी गुल या दहशतवाद्याचा गट भारतीय दूतावासावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून आत्मघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाली आहे. कंदाहारमधील भारतीय वकिलातीवर तालिबानी हल्ला चढविण्याची शक्यता आहे.