इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इस्लामिक धार्मिक नेते तथा खासदार मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानला १९७१ ची आठवण करून दिली आहे. तेव्हा पूर्व पाकिस्तान तुटून बांगलादेशची निर्मिती झाली होती. मौलाना फजलुर रहमान यांनी दावा केला आहे की, "बलुचिस्तानमधील पाच ते सात जिल्हे वेगळे होऊन स्वतःला स्वातंत्र घोषित करू शकतात." भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत, अशीच स्थिती पुन्हा उद्भवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याशिवाय, बलुचिस्तानातील जिल्ह्यांनी स्वतःला स्वातंत्र घोषित केले, तर संयुक्त राष्ट्र देखील त्यांच्या स्वातंत्र्याला मान्यता देऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, काही शक्तिशाली लोक बंद खोलीत बसून निर्णय घेतात आणि त्याचे पालन सरकारला करावे लागते, असे म्हणत त्यांनी पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.
पाकिस्तानच्या वायव्य कुर्रम भागात पुन्हा हिंसाचार उफाळून आला असताना मौलाना फजलुर रहमान यांचे हे विधान आले आहे. हा भाग गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानातील शिया-सुन्नी संघर्षाचे केंद्र आहे. नोव्हेंबर महिन्यात सुरू झालेल्या नव्या लढाईत आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झाला आहे. हा पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेला एक डोंगराळ भाग आहे. मोठ्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या लढवय्यांमधील संघर्षांमुळे हा भाग जगापासून जवळजवळ तुटलेला आहे. येथे अनेक वेळा युद्धबंदीचे प्रयत्न झाले, मात्र हिंसाचार थांबला नाही.
पाकिस्तानी पंतप्रधानांवरह निशाणा -जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान सभागृहात म्हणाले, "जर मी पंतप्रधानांना विचारले की बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा किंवा आदिवासी भागात काय सुरू आहे? तर कदाचित ते म्हणतील की, त्यांना माहिती नाही." सैन्याचे नाव न घेता ते म्हणाले, "पाकिस्तानमध्ये नागरी सरकारचे नियंत्रण नाही. येथे एक अशी संस्था निर्माण झाली आहे, जी बंद खोलीत काही निर्णय घेते आणि सरकारला त्यावर अंगठा लावावा लागतो."