ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 16 - काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गळ घातली आहे. ट्रम्प यांनी काश्मीरचा मुद्दा सोडवल्यास त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास काहीच हरकत नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र खात्याचे सल्लागार सरताज अजीज यांनी केले आहे.दरम्यान, ट्रम्प यांनी जर काश्मीर प्रश्नी लक्ष घालून तो वाद सोडविला, तर ते नोबेल पुरस्काराचे दावेदार ठरतील, असं वक्तव्य सरताज अजीज यांनी केलं आहे. काश्मीर मुद्द्यावर तिस-या देशाच्या मध्यस्थीला भारताचा कायम विरोध असतानाही अजीज यांनी ट्रम्प यांना लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतात अमृतसरमध्ये होणा-या आशिया परिषदेलाही आम्ही उपस्थित राहणार असल्याचं सरताज अजीज म्हणाले आहेत. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधल्या काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्यासाठी मी तयार आहे, असं ऑक्टोबरमध्ये एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. त्यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, मला पाकिस्तान आणि भारताला एकत्रितरीत्या विकसित होताना पाहायचे आहे. पाकिस्तान आणि भारत एकत्र आल्यास मला आनंद होईल. कारण दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. मला असं वाटतं मी या दोन्ही देशांना एकत्र आणू शकेन, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला होता.
काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी पाकची ट्रम्पना अनोखी ऑफर
By admin | Updated: November 16, 2016 19:51 IST