पेशावर : परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविलेल्या व्यक्तीस पाकिस्तानने बुधवारी फाशी दिली. फाशीच्या अंमलबजावणीवरील बंदी उठल्यानंतर देशात दिली गेलेली ही सातवी फाशी आहे. पेशावर शाळा हत्याकांडानंतर फाशीच्या अंमलबजावणीवरील बंदी सरकारने मागे घेतली होती. पाकिस्तान हवाई दलातील माजी कनिष्ठ तंत्रज्ञ नियाझ मोहंमद याला येथील मध्यवर्ती कारागृहात बुधवारी पहाटे फासावर चढविण्यात आले. २००३ मध्ये रावळपिंडी येथे मुशर्रफ यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नियाझ याला दोषी ठरविण्यात आले होते. तो कालपर्यंत हरिपूर मध्यवर्ती कारागृहात होता. आज सकाळी हेलिकॉप्टरद्वारे त्याला कारागृहात आणण्यात आले. दहशतवाद्यांकडून धोका असल्यामुळे कारागृहात व कारागृहाबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. आतापर्यंत फासावर चढविण्यात आलेल्या सात जणांपैकी सहा जण हे मुशर्रफ यांच्या हत्येच्या अयशस्वी प्रयत्नांत सहभागी होत.