न्यूयॉर्क : अल-काईदाच्या पाठिंब्याने युरोप आणि अमेरिकेत हल्ला करण्याचे कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अबीद नासीरला अमेरिकेतील ब्रूकलीन येथील प्रांतीय न्यायालयाने दोषी ठरविले असून त्याला जन्मठेप सुनावली जाऊ शकते.अल-काईदा या दहशतवादी संघटनेला या हल्ल्यासाठी साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या आरोपाखाली अबीद नासीरला दोषी ठरविण्यात आले आहे. एप्रिल २००९ मध्ये मँचेस्टर (इंग्लंड) येथील एका शॉपिंग सेंटरवर बॉम्ब हल्ल्याचा तो कटकारस्थानी होता. एवढेच नव्हे, तर हा कट तडीस नेण्यासाठी तो अन्य साथीदारांसह या ठिकाणी दाखलही झाला होता, असे सरकारी वकिलांनी सांगितले. अल-काईदाने न्यूयॉर्क शहरातील भुयारी मार्ग, कोपनहेगन येथील एका वर्तमानपत्राच्या कार्यालयासह मँचेस्टर येथेही हल्ला करण्याचा कट रचला होता. सुनावणीत नासीरने स्वत:च बाजू मांडताना अल-काईदा किंवा कोणत्याही कटाशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकचा नासीर अमेरिकेत दोषी
By admin | Updated: March 5, 2015 23:43 IST