जम्मू काश्मीरमधील पहगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात संतापाचं वातावरण आहे. जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. सुरुवातीला पाकिस्ताननेही या घटनेचा तोंडदेखला निषेध करून या हल्ल्यामागेल आपला हात असल्याचे नाकारले होते. मात्र आता पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांनी आपलं खरं रूप दाखवण्यास सुरुवात केली असून, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक असा केला आहे.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डार यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात हल्ला करणारे लोक हे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात.पहलागम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केल्याच्याप पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी हे विधान केलं आहे.
यावेळी इशाक डार यांनी भारताला इशाराही दिला आहे. जर भारताने पाकिस्तानला धमकावले किंवा हल्ला केला, तर पाकिस्तानसुद्धा त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, जर पाकिस्तानवर थेट हल्ला करण्यात आला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी पोकळ धमकीही इशाक डार यांनी दिली आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या सर्व पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून ठार मारण्यात आल्याचं समोर आलं होतं.