नवी दिल्ली : भारत दौ-यात राजधानी दिल्लीत तीन दिवस राहिल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आयुष्य सहा तासांनी घटले़ अमेरिकेच्या प्रसार माध्यमांनी हा दावा केला आहे़दिल्लीतील वायू प्रदूषणाचा हवाला देत, अमेरिकन माध्यमांनी एक अहवाल जारी केला आहे़ दिल्लीतील तीन दिवसांच्या वास्तव्यामुळे ओबामांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता यात वर्तवण्यात आली आहे़ दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे़जगातील अन्य शहरांपेक्षा दिल्लीच्या हवेत हानिकारक प्रदूषण पसरविणाऱ्या २़५ मायक्रोनपेक्षा सूक्ष्म कणांची (आरपीएम) सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे़ या सूक्ष्म कणांमुळे श्वसनासंबंधींचे आजार, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आदी आजार बळावतात़ भारताच्या भूगर्भ विज्ञान खात्याच्या आकडेवारीनुसार, ओबामांच्या तीनदिवसीय दौऱ्यादरम्यान दिल्लीतील सूक्ष्म कणांचा स्तर सरासरी ७६ ते ८४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर दरम्यान होता़ युनिव्हर्सिटी आॅफ केंब्रिजचे सांख्यिकी तज्ज्ञ डेव्हिड स्पीगलहेल्टर यांच्या मते, या प्रदूषणामुळे दिल्लीच्या मुक्कामात दरदिवशी ओबामांच्या आयुष्यातील दोन तास कमी झाले़