अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका १६ वर्षीय शालेय विद्यार्थ्याला शाळेत पिस्तूल नेल्याबद्दल आणि सोशल मीडियावर शाळेत गोळीबार करण्याची धमकी दिल्याबद्दल अटक करण्यात आली. एका जागरूक नागरिकांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी क्वीन्स येथील बेसाइडमधील बेंजामिन एन. कार्डोझो हायस्कूलमध्ये शिकतो. नुकताच त्याने इंग्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो हायस्कूलमध्ये गोळीबार करण्याची धमकी देताना पाहायला मिळते. एका जागरूक नागरिकाने विद्यार्थ्याची पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला कळवले. त्यानंतर एफबीआयने न्यूयॉर्क पोलिसांनी साधला. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी ताबडतोब हायस्कूल गाठून विद्यार्थ्याल्या शोधून काढले. त्यावेळी तपासादरम्यान, त्यांना विद्यार्थ्याच्या बॅगेत १३ कोळ्या आणि ९ ममीचे पिस्तूल सापडले.
ही घटना अमेरिकेतील बंदूक हिंसाचाराची गंभीर समस्या पुन्हा एकदा अधोरेखित करते. आकडेवारीनुसार, अमेरिकेत दरवर्षी गोळीबारात ४०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू होतो, ज्यात आत्महत्यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, दरवर्षी सुमारे २० दशलक्ष बंदुका विकल्या जातात.
अमेरिकेत बंदुकीबाबत कठोर कायद्याची मागणी केली जाते. मात्र, राजकीय मतभेदामुळे ठोस कारवाई करणे अनेकदा शक्य होत नाही. डेमोक्रॅट पक्ष सहसा कठोर नियंत्रणांवर जोर देतो, तर रिपब्लिकन पक्ष बंदुकीच्या स्वातंत्र्यावर अधिक भर देतो.