मास्को : युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशिया आक्रमकपणे हल्ले करीत असून, आता उत्तर कोरियाचे सैनिकही रशियाच्या बाजूने युद्धात उतरले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी याबद्दल उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांचे आभार मानले आहेत. सोमवारी उ. कोरियाने प्रथमच युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी आपले सैनिक रशियात पाठवले असल्याच्या चर्चेला पुष्टी दिली.
दरम्यान, ८ ते १० मेदरम्यान रशियात दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर रशियाने मिळवलेल्या विजयाबद्दल ‘विजय दिवस’ उत्सव होत आहे. यादरम्यान युक्रेनवरील हल्ले थांबवले जातील. हे तीन दिवस युद्धबंदी पाळली जाईल, असे रशियाने जाहीर केले.
क्रिमियावरून आमचेच : युक्रेन आक्रमक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन-रशिया युद्धात मध्यस्थीचा प्रस्ताव देताना क्रिमियावर रशियाचा दावा मान्य केला आहे. हा भूभाग रशियाकडे सोपवणे कोणत्याही परिस्थितीत मान्य केले जाणार नाही, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
इस्रायलचा गाझावर हल्ला; २७ नागरिकांचा मृत्यू
सोमवारी रात्री इस्रायलने गाझा भागात केलेल्या भयंकर हल्ल्यात २७ पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. गेल्या महिन्यात ‘हमास’शी युद्धबंदी संपल्यापासून रशियाने गाझावर रोज हल्ले चालवले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयावर संताप
इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी सोमवारी इस्रायलबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी म्हणजे आपल्या देशाचा छळवाद आणि इस्रायलच्या भूमिकेबाबत वैधतेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. राजकीय हेतूने प्रेरित ही सुनावणी असल्याचे सांगून सार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गाझा पट्टीत मानवी मदत पोहोचविण्यात इस्रायल अडसर आणत असल्याबाबत ४० देशांच्या विनंतीवरून ही सुनावणी होत आहे.