उत्तर कोरियातील हुकूमशाह किम जोंग उन त्यांच्या अजब-गजब निर्णयांसाठी बऱ्याचदा चर्चेत येतात. आता किम जोंग उन यांनी आईस्क्रीम या शब्दावर बंदी आणली आहे. आईस्क्रीम नावामधून परदेशी प्रभाव दिसून येतो असं किम जोंग उन यांचं म्हणणं आहे. त्यामुळे यापुढे एसीयुकिमो अथवा इयूरियुंबोसेउंगी हा शब्द वापरला जाईल. या शब्दांचा अर्थ बर्फापासून बनलेली मिठाई असा होतो.
डेली एनके रिपोर्टनुसार, किम जोंग उन यांना दक्षिण कोरियाई आणि पाश्चात्य शब्द देशातून हटवायचे आहेत. जर परदेशातून कुणी इथं आले तर त्याचा प्रभाव उत्तर कोरियात पडायला नको, त्याऐवजी इथून काही ते शिकून गेले पाहिजे असं किम यांना वाटते. त्यासाठी टूरिस्ट गाइड्ससाठी एक ट्रेनिंग केंद्रही उघडले जाणार आहे. काही इंग्रजी शब्दांचा वापर बंद करून त्याऐवजी पर्यटकांना उत्तर कोरिया शब्द शिकवले जाणार आहेत.
तर परदेशी पर्यटकांशी संवाद सोपा व्हावा यासाठी आम्हाला इंग्रजी शब्दांचा वापर करावा लागत होता असं एका ट्रेनी गाइडने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. आता किम जोंग उन यांनी घेतलेल्या निर्णयाने टूरिस्ट गाईडची कोंडी झाली आहे. त्याशिवाय किम यांच्या निर्णयाला विरोध करण्याची हिंमतही कुणामध्ये नाही. टूर गाइड होणे चांगले काम आहे. परंतु कुठल्याही प्रतिक्रियेमुळे एखाद्या संकटात सापडायला नको असं तिथल्या ट्रेनी गाइडने सांगितले.
एसीयुकिमो शब्द आर्किटीक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांकडून घेतला आहे. अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड आणि सर्बियासारख्या बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना एस्किमो नावाने ओळखले जाते. एस्किमो नावही वादाचे कारण बनले आहे. सांस्कृतिक ओळखीबाबत विविध समुदायातील लोक वेगवेगळे नाव पसंत करतात. तर किम जोंग उन केवळ ड्रामा करत आहेत. ज्या नवीन शब्दाचा वापर करण्याची ते भाषा करतात, तो शब्दही इंग्रजी भाषेतून आला आहे असं एका भाषा तज्ज्ञाने म्हटलं.