ब्रिटन : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना चुना लावून परदेशात पलायन केलेला हिरेव्यापारी नीरव मोदी ब्रिटनमधील वेस्ट एंड भागात तब्बल 72 कोटींच्या आलिशान सदनिकेमध्ये राहत आहे. न्यायालयाच्य आदेशावरून शुक्रवारीच मोदीचा अलिबाग येथील 100 कोटींचा बंगला स्फोटकांनी पाडण्यात आला. इंग्रजी वृत्तपत्र टेलिग्राफनुसार नीरव मोदी या सदनिकेसाठी महिना 15.5 लाक रुपये भाडे देत आहे. भारताने त्याची बँक खाती गोठविली असली, इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस दिली असली तरीही तो खुलेआम व्यवसाय करत आहे.
नीरव मोदीवर 13700 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडी पैशांची अफरातफर केल्याची चौकशीही करत आहे. त्याने विशेष न्यायालयाला पत्र लिहिले होते, की तो सुरक्षेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही. टेलिग्राफच्या वृत्तानुसार नीरव मोदी याला ब्रिटनने नॅशनल इंश्योंरेंस नंबर जारी केल आहे. यामुळे तो ब्रिटनमध्ये केवळ व्यवसायच नाही तर तेथील बँकांची खातीही वापरू शकत आहे.
हा बंगला पाडण्यासाठी एकूण 30 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे. बंगल्याच्या आजुबाजुच्या लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच वाहतुकही पूर्ण बंद ठेवण्यात आली होती.