नेतन्याहू सरकारने संपूर्ण गाझा पट्टीवर कब्जा करण्याचे आदेश दिल्यानंतर इस्त्रायली सैन्य अत्यंत क्रूरपणे पुढे सरकत आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, गाझामधील इस्त्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत किमान ६३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. जवळपास दहा लाख लोकांना जबरदस्तीने विस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इस्त्रायली सैन्य गाझा शहराच्या आणखी खोलवर भागात घुसले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायली रणगाडे गाझा शहराच्या सबरा भागात पुढे सरकत आहेत. या भागात यापूर्वीच हवाई हल्ले सुरू होते, परंतु, आता रणगाड्यांच्या हालचालींमुळे इस्त्रायल भूमीवरूनही हल्ला करण्याची शक्यता बळावली आहे.
सबरावर अनेक आठवड्यांपासून निशाणा
गाझाच्या सबरा भागावर अनेक आठवड्यांपासून इस्त्रायली हवाई हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे. गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयाच्या एका सूत्राने अल जझीराला सांगितले की, सबरावरील इस्त्रायली बॉम्बहल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी शनिवारी, इस्त्रायलने दक्षिण गाझामधील खान युनिसच्या वायव्य भागात असलेल्या असदा परिसरातील विस्थापित कुटुंबांच्या निवासावर गोळीबार केला होता, ज्यात सहा मुलांसह १६ लोकांचा मृत्यू झाला. दिवसभर मानवी मदतीच्या शोधात असलेल्या किमान २२ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, इस्त्रायल-नियंत्रित नेत्झारिम कॉरिडॉरजवळ मदत मागत असलेल्या एका नागरिकाला गोळ्या घालून ठार करण्यात आले. अशा विविध हल्ल्यांमध्ये ६३ नागरिक मारले गेले आहेत.
उपासमारीचे बळी वाढले!
पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत दोन मुलांसह आणखी आठ पॅलेस्टिनींचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी गाझावर इस्त्रायलने युद्ध सुरू केल्यापासून उपासमारीने मरण पावलेल्यांची एकूण संख्या २८१ झाली आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक मुनीर अल-बुर्श यांनी सोशल मीडियावर सांगितले की, या बळींमध्ये ११४ मुलांचा समावेश आहे.