ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळ दौ-याला कात्री लावल्यानंतर नेपाळमध्ये जोरदार विरोध प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. नेपाळ सरकार मोदींना सुरक्षा देण्यास अपुरी ठरल्यानेच मोदींनी जनकपूर, लुंबिनी आणि मुक्तिनाथमधील दौ-या रद्द केल्याचा स्थानिकांचे म्हणणे असून नेपाळ सरकारविरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावर उतरले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये जाणार आहेत. या दरम्यान मोदी जनकपूर, लुंबिनी आणि मुक्तिनाथ या शहरांमध्येही जाणार होते. मात्र रविवारी सकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोदी फक्त सार्क परिषदेतच उपस्थित राहणार असून अन्य तीन शहरांमधील नियोजित दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. याचे पडसाद नेपाळमध्ये पाहायला मिळाले. जनकपूर आणि अन्य भागांमधील नागरिक रस्त्यावर उतरुन नेपाळ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करु लागले. ऐवढेच नव्हे तर या भागांमधील दुकानेही बंद करण्यात आली.
दरम्यान, मोदींचा या तीन शहरांमधील नियोजीत दौरा रद्द झाल्याचे नेपाळ सरकारच्या वतीने शुक्रवारीच जाहीर करण्यात आले होते. मात्र भारताच्या वतीने यावर भाष्य करण्यात आले नव्हते. नेपाळ सरकारच्या घोषणेनंतर शुक्रवारीदेखील जनकपूरी भागात असाच कडकडीत बंद पाळण्यात आला होता.