Nepal Crisis : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया बंदीविरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनाने हिंसक वळण घेतले आहे. निदर्शनांमुळे अजूनही तिथे अशांततेची स्थिती आहे. भारतातील अनेक लोक तिथे अडकले आहेत. काठमांडूमधील एका हॉटेलला निदर्शकांनी आग लावली, त्यानंतर उत्तर प्रदेशातील एका जोडप्याने जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला.
गाझियाबादच्या नंदग्राम पोलिस ठाणे परिसरातील मास्टर कॉलनीतील रहिवासी रामवीर सिंह गोला हे त्यांच्या पत्नी राजेश गोलासह पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी काठमांडूला गेले होते. ७ सप्टेंबर रोजी दर्शनानंतर ते काठमांडूमधील हयात रेसिडेन्सी हॉटेलमध्ये थांबले होते, त्यावेळी रात्री ११ वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी हॉटेलला आग लावली. जीव वाचवण्यासाठी दोघांनीही चौथ्या मजल्यावरून उडी मारली.
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी
दोघेही बचाव पथकाने आधी ठेवलेल्या गाद्यांवर पडले. रामवीर आणि राजेश गंभीर जखमी झाले. पण निदर्शकांनी पुन्हा हल्ला केला. गोंधळात हे जोडपे वेगळे झाले. १० सप्टेंबर रोजी रामवीर सिंह यांच्या मुलाला नेपाळहून फोन आला. त्याला सांगण्यात आले की, त्याची आई आता राहिली नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांनी रामवीर सिंह एका मदत छावणीत जखमी अवस्थेत आढळले.
भारतीय दूतावासाच्या मदतीने, महिलेचा मृतदेह ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सोनौली येथे पोहोचला, तेथून कुटुंबीयांनी मृतदेह रुग्णवाहिकेत घेऊन गाझियाबादला रवाना झाले.
नेपाळमधील अंतरिम सरकारबाबत गोंधळ
यापूर्वी, नेपाळच्या Gen- Z निदर्शकांनी अंतरिम सरकारमधील त्यांच्या प्रतिनिधीवर एकमत झाल्याचे वृत्त आले होते. एका बैठकीत सुशीला कार्की यांच्या नावावर एकमत झाले. परंतु त्यानंतर लगेचच त्यांच्या प्रतिनिधीवरून मतभेद असल्याचे वृत्त आले. काही लोकांनी कुलमान घिसिंग यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याचा आग्रह धरला.
एकंदरीत, नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पण अनिश्चितता अजूनही कायम आहे. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, Gen- Z निदर्शकांनी एकमताने निर्णय घेणे, शक्य तितक्या लवकर अंतरिम सरकार स्थापन करणे आणि नवीन निवडणुका घेणे आवश्यक आहे.