बँकॉक: म्यानमार आणि शेजारचे थायलंड शुक्रवारी दुपारी ७.७ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. शक्तिशाली भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या आणि त्याखाली अनेक जण दबले. भूकंपात १६७ जण ठार झाले असून, ७३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
म्यानमारच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मंडाले शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता व येथे ६.४ तीव्रतेचा धक्का बसला. भूकंपानंतर राजधानी नेपिता व मंडालेसह सहा राज्यांत आणीबाणी जाहीर झाली; परंतु दीर्घकाळ रक्तरंजित गृहयुद्धाशी देश झुंजत असल्याने अनेक भागांमध्ये मदत कशी पोहोचेल, हे लगेच स्पष्ट झाले नाही. रेड क्रॉसने म्हटले आहे की, मंडाले व सागाइंग प्रदेश तसेच दक्षिण शान राज्यात वीजवाहिन्या कोसळल्या असल्यामुळे पथकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओसायन्सेसने सांगितले की, शुक्रवारचा भूकंप भूपृष्ठाखाली १० किलोमीटरवर होता. बँकॉकमध्ये भूकंप होताच नागरिकांत घबराट पसरली. आधीच वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवरून सायरनचा आवाज करीत अनेक वाहने धावू लागली. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. उन्नत जलद वाहतूक व्यवस्था आणि भुयारी मार्गही बंद करण्यात आला.
अवघ्या दोन तासांत म्यानमारला भूकंपाचे चार झटके बसले. त्यापैकी दोन धक्के फक्त १२ मिनिटांच्या अंतराने बसले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेनुसार भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. शास्त्रज्ञांच्या मते, म्यानमार व थायलंडच्या सीमेवर असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल हे याचे मुख्य कारण असू शकते. सध्या कोणत्याही देशाने त्सुनामीचा इशारा दिलेला नाही.
‘ताे’ व्हायरल व्हिडीओ...
बँकॉकच्या प्रसिद्ध चतुचक मार्केटजवळ तयार हाेत असलेल्या इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडीओ जगभर व्हायरल झाला. यात बहुमजली इमारत धुळीच्या लोटात कोसळताना दिसत आहे. परिसरातील अनेक लोक ओरडत जिवाच्या आकांताने धावताना दिसत आहेत. यात दाेन मजुरांचा मृत्यू झाला असून ८० जण बेपत्ता आहेत.
म्यानमारला चार झटके
धक्का वेळ तीव्रता
- पहिला सकाळी ११.५० ७.७
- दुसरा दुपारी १२.०२ ६.४
- तिसरा दुपारी १.०७ ४.९
- चाैथा दुपारी २.४८ ४.४
(स्थानिक वेळेनुसार)