म्यानमारमध्ये झालेल्या भयानक भूकंपात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध अजूनही सुरू आहे. याच दरम्यान बचाव कर्मचाऱ्यांना मोठं यश मिळालं आहे. म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या पाच दिवसांनंतर बुधवारी एका हॉटेलच्या ढिगाऱ्यातून एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भूकंपात आतापर्यंत २,७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
राजधानी नेपीता येथील एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २६ वर्षीय तरुणाला म्यानमार आणि तुर्की बचाव कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने रात्री १२:३० वाजता जिवंत बाहेर काढलं आहे. ७.७ रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सोमवारी मृतांचा आकडा २,७०० हून अधिक झाला, तर तब्बल ३,९०० लोक जखमी झाले आणि २७० लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे.
परिस्थिती आणखी बिकट
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत, परंतु आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जागा आणि संसाधनांची मोठी कमतरता आहे. कर्मचारी संख्या खूपच कमी असली तरीही ते त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. भूकंपापूर्वीही अनेक रुग्णालयांची अवस्था वाईट होती, पण आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
भूकंपात रुग्णालये उद्ध्वस्त
गेल्या महिन्याभरात, सात खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात आले कारण त्यांनी सरकारी रुग्णालयांच्या माजी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलं होतं. भूकंपाच्या आधीही मंडालेतील अनेक खासगी रुग्णालये बंद पडली होती कारण सरकारने त्यांना काम करण्यापासून रोखलं होतं. आता भूकंपात उर्वरित रुग्णालयेही उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे उपचार पूर्णपणे थांबले आहेत.
रक्ताने माखलेले रुग्ण, बेडची मोठी कमतरता
मंडाले जनरल हॉस्पिटलमधील दृश्य अत्यंत भयानक आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही रुग्णालयात प्रवेश करताच, रक्ताने माखलेले रुग्ण आजूबाजूला पडलेले होते. बेडची मोठी कमतरता होती, रुग्ण जमिनीवर पडले होते. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे काही लोक फक्त बसून होते, असहाय्य आणि हताश होते." म्यानमारमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.